मुंबई : इराण अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड अनिश्चितता आहे. संपूर्ण जग युद्धाच्या संकटाखाली आहे. शेअर बाजाराला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी पडझड दिसून येत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सोन्या- चांदीच्या किमती पडताना दिसतायत.
आज शुक्रवारी ( 3 मार्च ) 24 कॅरेट सोन्याची किंमत 3020 रुपयांनी घसरलीय. आज 10 ग्रॅम सोन्यामागे ग्राहकांना एक लाख 49 हजार 470 रुपये द्यावे लागतील. तर, काल चांदीचा दर 2 लाख 43 हजार 500 एक रुपयांवर स्थिरावला होता. आज किलोमागे चांदी 2 लाख 32 हजार 900 रुपयांवर पोहोचली आहे. आज चांदीचा दर जवळपास 10 हजार रुपयांनी उतरला आहे.
सोन्या चांदीमध्ये गेल्या महिन्याभरापासून चढउतार
गेल्या महिन्याभरापासून सोने चांदीच्या दारात प्रचंड चढ-उतार सुरू आहेत . परिणामी ग्राहकांना सोनं खरेदी करावं की नाही हा संभ्रम कायम आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, मध्यपूर्व भागातील तणाव, युद्धासंबंधी होणारे निर्णय, घोषणा या सगळ्याच्या परिणामामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान महिनाभरापासून सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळतेय.
महिनाभरापूर्वी एक लाख 61 हजार 800 रुपयांवर असणाऱ्या सोन्याचा भाव मागच्या आठवड्यात 1 लाख 45 हजार रुपयांवर पोहोचला. काल (2 एप्रिल ) 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1 लाख 52 हजार 490 रुपयांवर होता. चांदीचे दरही गेल्या महिन्याभरापासून घसरताना दिसत आहेत. महिनाभरापूर्वी 2 लाख 65,880 रुपयांवर असणारी चांदी आठवड्याभरापूर्वी दोन लाख 27 हजार 930 रुपयांवर पोहोचली होती. आज चांदीचा किलोमागे दर 2 लाख 32 हजार 900 रुपये झाला आहे.
दरात घसरण का झाली?
जागतिक स्तरावर युद्धाचे सावट असतानाही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली ( ) केल्याने सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या झळाळीत घट झाली आहे.